चांदण्यांखाली रोमँटिक ट्रिप करायची असेल तर हा प्लॅन फक्त तुमच्यासाठी !
इज इंडिया ट्रॅव्हल पर्यटकांसाठी नवीन ट्रिप आयोजित करत आहे आणि ती अरेंज करत आहोत छत्तीसगडमधील नावाजलेल्या चित्रकोट परिसरामध्ये! सर्वप्रथम चित्रकोट आणि आजूबाजूंच्या पर्यटनस्थळांबद्दल आपण माहिती पाहूया. बस्तरमधील चित्रकोट धबधबा हे छत्तीसगढ राज्यामधील एक आकर्षण पर्यटन स्थळ आहे. जसा कॅनडा मध्ये नायगारा धबधबा जगभर प्रसिद्ध आहे तसाच हा धबधबा भारताला लाभलेली एक सुंदर नैसर्गिक देणगी आहे. जगभरातून युवक – युवती येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला भेट द्यायला येतात. बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथे इंद्रावती नदीवर साधारणतः ९५ फुटांवरून वाहणारा हा धबधबा अतिशय सुंदर आहे. याला भारताचा नायगारा असेही संबोधले जाते. या धबधब्याच्या अवतीभोवती घनदाट जंगल देखील आहे त्यामुळे दुधासारख्या धबधब्याबरोबरच हिरवळीचा आनंद देखील पर्यटकांना या ठिकाणी घेता येतो. या धबधब्याची रुंदी हवामानानुसार बदलते. पावसाळ्यात हा धबधबा खूप मोठ्या व्यापक स्वरूपात असतो आणि जसजसा उन्हाळा येऊ लागतो तसतशी याची रुंदी कमी होऊ लागते. भारताच्या पर्यटन दृष्टिकोनातून हा सर्वात जास्त रुंद असलेला धबधबा आहे, आणि सर्व सीझनमध्ये हा धबधबा वाहताना दिसतो. याची खासियत म्हणजे पावसाळ्यात हा लाल किंवा तांबूस रंगाचा असतो तर पावसाळा संपला कि चांदण्या रात्रीमध्ये हा पांढऱ्या शुभ्र दुधासारखा वाहत असतो. हा धबधबा तीर्थगढ धबधब्याचा भाग आहे, जो ३०० फूट खोलीपर्यंत वाहतो. उंच पर्वत- खोऱ्यांमधून वेगवेगळ्या दिशांना हा धबधबा वाहतो
वास्तवतः छत्तीसगड हा एक जंगल प्रदेश आहे. येथे आदिवासी संस्कृतीचा वारसा फार मोठ्या प्रमाणात आहे. अगदी परदेशातून लोक येथील संस्कृती पाहावयास येतात आणि अभ्यास देखील करतात. येथे आदिवासी लोकांचे विविध आकर्षक अलंकार, दाग दागिन्यांचे स्टॉल आहेत. एक फॅशन म्हणून ते फारच सुंदर वाटतात. जगदलपुर पासून २५ किमी अंतरावर कांगेर- फुलांची दरी हे राष्ट्रीय उद्यान आहे. वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगीबेरंगी फुले तुम्हाला येथे बघावयास मिळतात. येथून ३० किमी अंतरावर ‘कोटमसर’ ही विश्वप्रसिद्ध प्राकृतिक गुहा आहे. या गुहेत अगदी पाषाणकालीन चिन्हे आढळतात. गुहेमध्ये जलकुंड देखील आहे जेथे कासवे आणि मगरींची रेलचेल आहे.. वेगवेगळ्या मार्गाने जाणारे जलप्रवाह देखील या गुहेत आश्चर्यकारक वाटतात. ज्यांना इतिहास आणि गूढता यामध्ये स्वारस्य असेल त्यांनी जरूर या गुफेला भेट द्यावी. कोटमसर गुहेबरोबरच कैलास गुहा दंडक गुहा आणि अरण्यक गुहा देखील बघण्यासाठी आकर्षक आहेत.
एक धाडसी पर्यटन म्हणून छत्तीसगडचा विकास होताना दिसत आहे. चहुबाजूनी डोंगरदऱ्यांनी नटलेला हा प्राकृतिक प्रदेश खरोखर पर्यटकांना लोभीत करणारा आहे. जल पर्यटन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात १०० फुटांवरून वाहणारी पर्वतीय नदीवर केंदई नावाचा एक धबधबा देखील फार रोमांचकारी आहे. जेव्हा आपण कुठेही ट्रिप करण्याच्या विचारात असतो तेव्हा आपण तेथील अनुकूल वेळ नेहमीच विचारात घेतो. तर चित्रकोट ठिकाणाला भेट देण्यासाठी जुलै – सप्टेंबर हा पावसाळ्यातील काळ अनुकूल आहे. मान्सून काळात पाणी मोठ्या प्रमाणात असते. खाली पडणारे पाणी खडकांवर आदळून अधिक उंचीवर फवारे मारताना दिसते. अगदी याच वेळी धूसर आकाशात इंद्रधनुष्य देखील पर्यटकांना सातत्याने बघावयास मिळतात. ही इंद्रधनुष्ये येथे फारच प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला अगदी टेन्शनमुक्त अशी ट्रिप हवी असेल तर तुम्ही हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जाण्याची संधी सोडू नका. कारण थंडीच्या काळात चांदण्या रात्रीमध्ये तुम्ही या दुधाळ धबधब्यांचा आणि येथील हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटू शकता. चित्रकूट धबधब्याचा आवाज इतका मोठा आहे कि त्यापलीकडे काही ऐकणे कठीण आहे. या धबधब्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जंगलामध्ये आढळणारे सुंदर पक्षी या ठिकाणची सुंदरता आणखी वाढवतात.
चित्रकोटला पोहोचल्यानंतर तुम्ही अनेक गोष्टी करू शकता जसे कि, ज्यांना ऍडव्हेंचर करण्याची इच्छा असते ते शौकीन येथे बोट चालवू शकतात. ज्यांना तीर्थांना भेट द्यायची आवड असते ते येथील शांतपणे वाहणाऱ्या धबधब्याखाली आनंदाने अंघोळ करू शकतात. या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर देखील आहे. धबधब्याखाली अनेक तलाव देखील आहेत. या तलावांकाठी अनेक शिवलिंग देखील आहेत आणि भगवान शंकराचे त्रिशूळ आहेत. तलावांमध्ये तुमच्यासाठी बोटींगची सुविधा देखील आहे. अगदी मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत तुम्ही बोटिंगचा आंनद घेऊ शकता. हे सर्व पर्याय तुम्हाला येथे उपलब्ध आहेत.
Ranjana Kokane October 27, 2019