Top
  >  Blog Featured   >  तुम्हाला बेलमेटल शिल्पकला जाणून घ्यायची असेल तर लवकर वाचा!

तुम्हाला बेलमेटल शिल्पकला जाणून घ्यायची असेल तर लवकर वाचा!

प्राचीन शिल्पकलेचा आनंद आपण नेहमी ऐतिहासिक स्थळे किंवा मंदिरांमधून घेतलेला आहे. आजकालची कला हि केवळ भावनिक आनंदासाठी मर्यादित राहिली नाही तर तिचा भौतिक सुखासाठी देखील उपयोग केला जात आहे जसे कि, रोजच्या दैनंदिनी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, फर्निचर, वस्त्रनिर्मिती किंवा सर्वच ग्लॅमर ठिकाणी कलेचा वापर हा आवश्यक बनला आहे. म्हणजेच कलेचे आधुनिकीकरण हे लोकांची लाइफस्टाइल आणि उपलब्धतेवर काहीशी विसावलेली दिसते, प्राचीन शिल्पकला आज फारशी दिसत नाही. आपण आपली हि कला हरवली तर नाही ना… ? नाहीये, कारण आजही छत्तीसगढ मधील बस्तर भागात आदिवासींनी उदयास आणलेली आणि आजतागायत जोपासलेली बेलमेटल शिल्पकला मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. येथील अनेक कारागिरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच कलेवर आहे. या धातू शिल्पकलेमध्ये ई. स. २५०० पूर्वीच्या हडप्पा संस्कृतीची झलक दिसते. सिंधू संस्कृतीकालीन कलेमध्ये जसे हत्ती- घोडे, देवी देवतांचा चित्रांचा समावेश दिसतो त्याचप्रमाणे बेलमेटल शिल्पकलेमध्ये देखील यांची झलक पाहावयास मिळते. शोभेच्या वस्तू, देवघरातील मूर्ती आणि पूजापाठ सामग्री व्यतिरिक्त घरगुती वापराच्या वस्तूदेखील या कलेद्वारे सजविल्या आहेत.

येथील कारागीर आणि वृद्ध लोक सांगतात कि येथील दंडकारण्य आदिवासी भागातील  लोकांचा संबंध हडप्पा संस्कृतीशी होता. येथील कारागीर आजही धातू शिल्प बनविताना मधाच्या पोळ्याचा वापर करतात आणि हि येथील परंपरागत प्राचीन कला आहे.  पदमश्री पुरस्कृत श्री स्व. जयदेव बघेल यांनी बनविलेली ‘कल्पवृक्ष’ शिल्प कलाकृती आजही मुंबईतील ताज हॉटेलमध्ये शोभिवंत आहे. बेलमेटल शिल्पकलेला ‘डोकरा आर्ट’ देखील संबोधिले जाते. या कलेला बघण्यासाठी देश – विदेशातून लोक बस्तरला खासकरून भेट देतात आणि जाताना एक मूर्ती आठवण म्हणून आवर्जून घेऊन जातात. बस्तर जिल्ह्यातील जवळपास दहा हजार कुटुंबे हि बेलमेटल कलेमध्ये पारंगत आणि अवलंबून आहेत. गढवा समाजातील लोक विशेषतः या कलेत पारंगत आहेत. वडिलोपार्जित हा त्यांचा व्यवसाय आहे आणि आज देखील हि कला त्यांनी अजरामर ठेवली आहे. त्यामुळे बस्तर येथील कोंडागाव भागाला शिल्पनगरी म्हणून देखील संबोधिले जाते. तसे बघायला गेले तर सुंदर आणि अमूल्य अशा कलाकृतीला दलालांकडून कारागिरांना फारशी किंमत मिळत नाही. त्यांचा फक्त उदरनिर्वाह या कलेमुळे होतो. जसे शहरातील कलाकार एका शिल्पकलेचे किंवा पेंटिंगचे लाखोंनी पैसे घेतात. परंतु येथील कारागिरांना एका शिल्पकृतीसाठी अनेक दिवस घालवावे लागतात आणि पैसे मात्र तुटपुंजेच मिळतात. परंतु तरीही येथील लोकांनी या पुरातन कलेला हृदयापासून जपलेले आहे.

बेलमेटल शिल्प कलाकृती बनविण्यासाठी पितळ, कांस्य, जस्त, तांबे आणि अल्युमिनियम वापरले जाते. सुरुवातीला मातीपासून एक ढोबळ आकृती तयार केली जाते. त्यावर पुन्हा मधाच्या पोळ्याने डिझाईन बनविली जाते. त्यावर पुन्हा दुसऱ्यांदा नदीकिनाऱ्यावरील चिकन मातीचा लेप दिला जातो आणि नंतर भट्टीमध्ये भाजून पक्की बनविली जाते. त्यानंतर वरील सर्व धातूंच्या द्रवरूप मिश्रणरहित साच्यात टाकून फायनल टचअप दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेला साधारणतः एक आठवडा लागतो.

स्थानिक कारागीर सांगतात कि सरकारकडून त्यांच्या कलेसाठी कुठल्याही प्रकारची फारशी मदत मिळत नाही त्यामुळे ते मागासलेल्या अवस्थेत आहेत. परंतु छत्तीसगढ हस्तशिल्प विकास बोर्डाचे रिजनल मॅनेजर बसंत कुमार साहू सांगतात कि मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता आणि बेंगलोर सारख्या महानगरांमध्ये या कलेचे प्रदर्शन आवर्जून भरवले जाते. मुंबईमधील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये येथील कलाकृती प्रदर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत. ताज हॉटेल हल्ल्यानंतर ‘कल्पवृक्ष ‘ बेलमेटल कलाकृतीखाली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनी मेणबत्ती लावून शहिदांना आदरांजली वाहिली होती. २०१३ मध्ये भोपाळमधील भारतीय मानवी विज्ञान संग्रहालयात या कलाकृती सिंधुकालीन सभ्यता दर्शविण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या तसेच त्यावर एक रिपोर्ट देखील सादर करण्यात आला होता. तर अशा या असाधारण कलेचा आस्वाद ”पाहीन मी याची देही याची डोळा” या उक्तीप्रमाणे घेता येईल इज इंडिया ट्रॅव्हल सोबत. येत्या काही दिवसातच हि ट्रिप आयोजित करण्यात येणार आहे कारण प्रदर्शन काळ आणि तेथील कलाकृतींच्या पूर्णतेची वेळ बघूनच सर्व गोष्टींची आखणी केली जाणार आहे त्यामुळे कलाप्रेमींसाठी आणि घरातील प्रत्येक तरुण आणि वृद्धांसाठी हि एक आगळी पर्वणी असेल!

Ranjana Kokane