Top
  >  Blog Featured   >  काय आहे फॉरेस्ट बाथिंग ? अनुभवायचे असेल तर चला केरळ-वायनाड मध्ये!

काय आहे फॉरेस्ट बाथिंग ? अनुभवायचे असेल तर चला केरळ-वायनाड मध्ये!

फॉरेस्ट बाथिंग म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल. जंगलात जाऊन अंघोळ करायची कि काय असं वाटलं असेल. परंतु फॉरेस्ट बाथिंग म्हणजे अगदी मुक्त होऊन निसर्गात वावरणे, स्वतःला निसर्गाशी जोडणे आणि निसर्गाचा एक भाग बनून एकरूप राहणे जे आपल्या आरोग्यासाठी हितवर्धक आहे. आपले शरीर हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि आपल्या दैनंदिनीमध्ये आपण मूळ स्वच्छ निसर्गापासून दुरावलो आहोत. आपल्या शहरी जीवनात आपली पंचतत्वे कमजोर बनतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मूळ तत्वाकडे काही काळ घेऊन जाणे हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या गरजेचे आहे. फॉरेस्ट बाथिंग म्हणजे आपले शरीर काही काळाकरिता ट्रीटमेंट म्हणून निसर्गाशी जोडला जाणे असे देखील म्हणता येईल.

निसर्गाला जोडणारी फॉरेस्ट बाथिंग ही संकल्पना मुळतः जपान सरकारच्या शेती, वन मत्स्य विभागाने १९८० च्या उत्तरार्धात जगाला माहिती करून दिली . ‘शिनरीं योकु’ असेही जपानी भाषेत म्हटले जाते. हळूहळू पाश्चात्य देशांनी देखील या गोष्टीचा अवलंब केला. साधारणतः सगळ्यांना वाटते कि जेव्हा आपण जंगल ट्रिप करतो त्यावेळी घामाने आपली अगदी आंघोळीच होते, मग ती अंघोळ तर नव्हे. पण तसे मुळात नाही आहे. फॉरेस्ट बाथिंग हा निसर्गातील वेगवेगळ्या गोष्टींचा संच आहे जो हळुवारपणे अनुभवायचा असतो, जगायचा असतो.

औषधे, किंवा योगा व्यायाम न करता निरोगी जीवन जगण्यासाठी ही पद्धत जपानमध्ये वापरली जाते. फॉरेस्ट बाथिंग म्हणजे जंगलामध्ये आरामदायी शांतपणे फिरणे. १९८२ मध्ये जपानने नॅशनल हेल्थ कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला नाव दिले होते ‘शिनरिन योकू’ ज्याचा अर्थ वृक्षांच्या सहवासात जास्त वेळ राहणे. जसेजसे लोकांना निरोगी आणि फिट राहण्याकरिता त्याचे महत्व कळू लागले आणि या पद्धतीचे पर्यटन सुरु झाले. वैज्ञानिकांच्या मते फॉरेस्ट बाथिंग म्हणजे केवळ झाडांची शुद्ध आणि साफ हवा मिळवणे नव्हे तर वृक्षांसोबत राहताना वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा द्रवांचा सुगंध आपल्या संपूर्ण शरीरात जात असतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या किटाणू आणि व्हायरसपासून आपले सरंक्षण होते तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयविकारांना देखील आळा बसतो. आजच्या धकाधकीच्या, टेक्नॉलॉजी – आय टी जीवनात अनेक प्रकारचे ताणतणाव निर्माण होतात. यासाठी फॉरेस्ट बाथिंग एक रामबाण उपाय आहे. कुणाचे आयुष्य असे तणावयुक्त असेल तर त्यांनी लगेचच फॉरेस्ट बाथिंगचा प्लॅन करायला हरकत नाही. यामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक शक्ती मिळेल आणि अधिक निरोगी देखील व्हाल. जिम वगैरे गोष्टी कराव्या लागणार नाहीत. आजकाल फॉरेस्ट बाथिंग क्लब सेंटर देखील तयार केलेले आहेत जे युरोप अमेरिकेमध्ये फार लोकप्रिय बनत आहेत. जपानने तर फॉरेस्ट बाथिंग त्यांच्या पॉलिसीचा एक भाग म्हणून जाहीर केले आहे त्यामुळे तेथे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या कार्यक्रमामध्ये लोक आनंदाने सहभागी होऊन नवीन आयुष्य मिळवितात. म्हणूनच त्यांना काम करताना अधिक उत्साह आणि शक्ती मिळते आणि ते नेहमी आनंदी असतात. आपल्याला फक्त जागतिक पर्यावरणाच्या दिवशी झाडांची आठवण होते परंतु त्या दिवशी देखील तुम्ही फॉरेस्ट बाथिंगचा प्लॅन करू शकता आणि त्यांच्याकडून निरोगी राहणे शिकले पाहिजे. यामुळे झाडाझुडुपांविषयी आपुलकी तसेच प्रेम निर्माण होऊन जंगलतोड कमी होईल आणि संवर्धन जास्त होईल. तसेच आपल्या सुंदर वसुंधरेसमोर ग्लोबल वार्मिंगचे जागतिक संकट कमी होण्यास मदत होईल.

भारताच्या इतिहासात देखील घनदाट झाडाझुडपांमध्ये तपस्या करण्याची परंपरा होती याच पद्धतीची परंपरा आत्ताच्या काळात जपानने स्वीकारली आहे. जंगलामध्ये वृक्षांच्या सान्निध्यात काही वेळ मेडिटेशन करणे खूप आरोग्यदायी आहे. एका फ्रेंच शास्त्रज्ञाने सांगितले आहे कि निसर्गाच्या सान्निध्यात राहिले कि माणूस अधिक उदार बनतो आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक वाढते, जे सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी चिपको आंदोलन तर नुकतेच मुंबईतील आरे आंदोलन देखील मानव आणि निसर्गाला बांधणारे काही प्रमाणातील यशस्वी प्रयत्न आहेत.

फॉरेस्ट बाथिंग जीवन पद्धती जरी जपानने सुरु केली असली तरी सर्व मानवजातीला आज त्याची गरज आहे. भारतामध्ये जंगल मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सहजपणे तुम्ही फॉरेस्ट बाथिंग प्लॅन करू शकता. या प्लॅनसाठी इज इंडिया ट्रॅव्हल तुम्हाला मदत करत आहेत. केरळच्या निसर्गरम्य परिसरात वायनाड  ठिकाणच्या जंगलात तुम्हाला ही ट्रिप अनुभवायची संधी आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसोविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

Ranjana Kokane October 28, 2019